महाराष्ट्राला थोर समाजसुधारक, विचारवंत, कवी, संत, साहित्यिक अशी परंपरा लाभली आहे. लोकमान्य टिळक, वि.दा. सावरकर, संत तुकाराम अशी अनेक रत्ने आपल्या महाराष्ट्रात जन्माला आली आहेत. यांतील प्रत्येकाने आपली वेगळी अशी ओळख निर्माण केलेली आहे. परंतु अशी कुठली व्यक्ती आहे जी या सर्व उपाध्या धारण करू शकते? कुठली एक अशी व्यक्ती आहे जिने या सर्व क्षेत्रांत आपले अमूल्य योगदान दिले आहे? या प्रश्नाचे एकमेव उत्तर म्हणजे अण्णाभाऊ साठे.
लोकशाहीर म्हटलं कि सुरुवातीला आठवणारं नाव म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे.
*“जग बदल घालूनी घाव, सांगुनी गेले मज भीमराव”*
समाजाला एक नवी दिशा देण्याचे कार्य त्यांच्या साहित्यातून घडले. उपेक्षित समाजातील जनमानसाचा आवाज उठवण्याचे काम त्यांच्या लेखनीतून झाले. आपल्या अजरामर साहित्यिक कृतीतून त्यांनी महाराष्ट्रात परिवर्तन घडवून आणले.
तुकाराम भाऊराव ऊर्फ शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला.
अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अश्या अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.
१९४४ ला त्यांनी `लाल बावटा` पथक स्थापन केले आणि बघता बघता ते शाहीर झाले. `माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली।।`ही त्यांची गाजलेली लावणी होती. अण्णाभाउंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि राष्ट्रध्यशक्षांकडून त्यांचा सन्मान देखील झाला. १६ ऑगष्ट १९४७ साली “ये आझादी जुठी हे देश कि जनता भुकी हे” असा नारा शिवाजी पार्क वर दिला त्या दिवशी पावसाने रौद्र रूप धारण केले होते. मात्र, तरीही अण्णाभाऊ मागे हटले नाहीत.
अण्णा भाऊंनी आपल्या लेखनकाळातील अल्पायुष्यात २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्याही लिहिल्या. त्यापकी सात कादंबऱ्यांवर मराठी चित्रपटही नामवंत दिग्दर्शकांनी काढले. ‘फकिरा’ या कादंबरीला १९६१ साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला आणि तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांनीही कादंबरीचे कौतुक केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरा’मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणाऱ्या फकिरा या लढाऊ तरुणाचे चित्रण आहे.
(१ ऑगस्ट १९२०–१८ जुलै १९६९). कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील लेखन केलेले ख्यातनाम मराठी साहित्यिक. ब्रिटिशराज्यकर्त्यांनी ‘गुन्हेगार’ म्हणून शिक्का मारलेल्या एका जमातीत त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊ सिधोजी साठे, तर आईचे नाव वालबाई होते. त्यांचे मूळ नाव तुकाराम. जन्मस्थळ वाटेगाव (ता.वाळवा; जि. सांगली ). त्यांचे शालेय शिक्षण झालेले नव्हते; तथापि त्यांनी प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान मिळविले. १९३२ साली वडिलांसोबत ते मुंबईला आले. चरितार्थासाठी कोळसे वेचणे, फेरीवाल्यांच्या पाठीशी गाठोडे घेऊन हिंडणे, मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी, अशी मिळतील ती कामे त्यांनी केली. मुंबईत कामगारांचे कष्टमय, दुःखाचे जीवन त्यांनी पाहिले. त्यांचे संप, मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणाही त्यांनी अनुभवला. १९३६ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले.
अण्णाभाऊंची निरीक्षणशक्ती अत्यंत सूक्ष्म आहे. त्यांच्या लेखन शैलीला मराठमोळा, रांगडा पण लोभस घाट आहे. नाट्यमयता हाही त्यांच्यालेखनशैलीचा एक खास गुण. ज्या विपर्यस्त जीवनातून अण्णाभाऊंनी अनुभव आत्मसात केले, त्यांतील क्षणांचा वेग आणि आवेग त्यांच्या लेखनातजाणवतो. लवचिक भावचित्रे अंगासरशा मोडीने साकार करण्याची त्यांची लकबही स्वतंत्र आहे. लेखनावर त्यांनी जीव जडवला होता; त्यांनी ते विपुलकेले.
साहित्य सम्राट, लोकशाहीर, विचारवंत, समाजसुधारक अशा कितीतरी उपाधी धारण केलेले अण्णाभाऊ साठे यांची जयंती हि १ ऑगस्ट रोजी आपण साजरी करतो. या दिवशी आपण त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करू.
आपण त्यांचे विचार अवलंबविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समाजातील वैर संपविण्यासाठी त्यांचे लेखन हे खूप महत्वाचे ठरते. महाराष्ट्राला किंबहुना जगाला एक नवी दिशा देण्याचे कार्य त्यांच्या साहित्यातून घडून येत आहे.