लोन ॲप कंपन्याकडून नागरिकांची लुटमार पोलिसांनी केले हे आवाहन
सोशल मीडियाचे जेवढे फायदे असतात , तेवढे तोटे असतात . मोबाईल लोन ॲपच्या दादागिरीमुळे आता नागरिकही अक्षरश : त्रस्त झाले आहेत .
पुणे : सोशल मीडियाचे जेवढे फायदे असतात , तेवढे तोटे असतात . मोबाईल लोन ॲपच्या ( Loan ) दादागिरीमुळे आता नागरिकही अक्षरश : त्रस्त झाले आहेत . याच पद्धतीने गेल्या पाच महिन्यात पुणे शहरातील तब्बल चौदाशे जणांना ' मोबाईल लोन ॲप'द्वारे शिवीगाळ , बदनामी व जीवे मारण्याच्या धमक्या आल्याची तक्रार सायबर ( Cyber ) पोलिसांकडे आली आहे .
खासगी सावकार , फायनान्स कंपन्या , वाहन , गृह कर्ज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून कर्जफेडीसाठी नागरिकांना त्रास देऊन त्यांचे जगणे मुश्किल केले जात असल्याचा घटना शहरात सातत्याने घडत आहेत . त्यामध्ये ' मोबाईल लोन ॲप'ची भर पडली आहे . कोरोनामुळे अनेक नागरिकांच्या नोकऱ्या , छोटे - मोठे व्यवसाय गेले . त्यामुळे अनेकांचे जगणे मुश्किल होत आहे . त्यामुळे काही जणांकडून थोडेफार कर्ज घेऊन छोटा - मोठा व्यवसाय सुरू करण्याचा कल असतो . बँका , फायनान्स कंपन्या आणि नातेवाईकांकडे काही वेळा ५ ते १० हजार रुपये कर्ज मिळणे मुश्किल असते .
त्यामुळे या नागरिकांना तत्काळ कर्ज मिळण्यासाठी ' मोबाईल लोन ॲप'कडे वळतात . मात्र , त्यानंतर हे नागरिक ' मोबाईल लोन ॲप'च्या जाळ्यात अडकतात . घेतलेल्या कर्जामुळे ॲप कंपन्यांच्या संबंधित व्यक्तींकडून कर्ज घेणाऱ्या नागरिकांना त्रास दिला जातो . यामुळे या ॲपवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे .
दरम्यान , सदर ॲप वाले हे ५ ते १० हजार रुपयांचे कर्ज देतो , अशा आकर्षक जाहीराती फेसबुक , ट्विटर , व्हाट्स ॲपवर झळकतात . त्या जाहीरातील नागरिक प्रतिसाद देऊन कर्ज घेतात . त्यानंतर कर्जफेड करण्याची मुदत संपल्यानंतर तत्काळ संबंधित कंपन्यांच्या व्यक्तीचे फोन येण्यास सुरुवात होते . त्यानंतर कर्ज घेणाऱ्यांच्या कुटुंबीयांपासून ते मित्र , नातेवाईकांनाही फोन , मेसेजद्वारे संपर्क साधून अश्लील भाषेत शिवीगाळ , धमकी दिली जाते . त्यामुळे नागरीक अक्षरशः त्रस्त होत आहे . मात्र , असे कॉल आल्यावर थेट पोलिसात तक्रार करा , असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
मोबाईल लोन ॲप ' बाबतच्या तक्रारी वर्ष तक्रारी
२०२० - ६९९
२०२१ - ९२८
२०२२ ( आतापर्यंत ) - १४३६