Type Here to Get Search Results !

फलटण | भिवाईदेवी एक अलौकिक तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करणार : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

श्री भिवाईदेवी एक अलौकिक तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करणार : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा)


फलटण दि.९ : विस्तीर्ण नीरा नदी काठ आल्हाददायक नैसर्गिक वातावरण, महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातून येथे नियमीत असणारी भाविकांची मोठी वर्दळ आणि त्यांची भिवाई देवीवर असलेली अपार श्रद्धा या सगळ्या बाबी लक्षात घेऊनच श्री भिवाईदेवी अतिप्राचीन मंदिर व परिसराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून आगामी काळात हे राज्यातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून विकसीत करुन सर्व सोयी सुविधासह एक उत्तम तीर्थक्षेत्र म्हणून नावारुपाला आणण्याची ग्वाही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी दिली आहे.


कांबळेश्वर ता.फलटण येथील अतिप्राचीन भिवाईदेवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे लोकार्पण आणि कलशारोहण कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) बोलत होते, अध्यक्षस्थानी आ.दिपकराव चव्हाण साहेब होते. यावेळी श्री सेवागिरी मंदिर ट्रस्ट, पुसेगावचे मठाधिपती महंत प.पू.सुंदरगिरी महाराज, माजी आमदार प्रकाश शेंडगे, सौ.रेणूकाताई शेंडगे, मा.सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर (बाबा), माणिकराव सोनवलकर, शंकरराव माडकर, सौ.कमलताई माडकर, रामभाऊ ढेकळे, बाबा खरात सर, सौ.रेखाताई खरात, राजेंद्र कोकरे, सौ.योगीता कोकरे, पांडुरंग गुंजवटे, समर जाधव, कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले, प्रा.रविंद्र कोकरे, राम नाईक निंबाळकर, बाळासाहेब ठोंबरे, भिवाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठलराव भिसे सर, भिवाई देवस्थान ट्रस्टचे सचिव शिवाजीराव काळे सर आणि सर्व ट्रस्टी, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी सर्व मान्यवरांनी श्री भिवाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर प.पू.महंत सुंदरगिरी महाराज यांच्या शुभहस्ते कलशारोहण विधीवत संपन्न झाले. त्यावेळी उपस्थितांनी श्री भिवाईदेवी व श्री धुळोबाच्या नावाचा गजर करीत सारा परिसर दणाणून सोडला.


अनेक वर्षांपासून या मंदिराचा जीर्णोद्धार व कलशारोहणाची भाविक भक्तांची मागणी प्रलंबीत होती ती आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांच्या उपस्थितीत पूर्णत्वास जात असल्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच या अतिप्राचीन आणि देशाच्या विविध भागातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तीर्थ क्षेत्राला महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांच्या माध्यमातून प्रथम 'क' आणि नंतर 'ब' वर्ग तीर्थ क्षेत्राचा दर्जा प्राप्त करुन घेऊन शासनाचा भरीव निधी येथील विकास कामांसाठी उपलब्ध झाला, त्याचप्रमाणे भाविक भक्तांनीही कोट्यावधी रुपयांच्या देणग्या दिल्यानेच जीर्णोद्धार व कलशारोहण पूर्णत्वास गेले आहे, तथापि एवढ्यावरच न थांबता आगामी काळात शासन, भाविक आणि आम्हा सर्वांच्या प्रयत्नातून या तीर्थ क्षेत्राची विकास प्रक्रिया अखंडित सुरु ठेवून एक अलौकिक तीर्थ क्षेत्र उभारण्यात येणार असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी स्पष्ट केले.


नीरा नदीवरील उभारण्यात येत असलेल्या बंधाऱ्यामुळे नदी पात्रात साठणाऱ्या पाण्याचा फुगवटा येथपर्यंत पोहोचल्याने हे अतिप्राचीन आणि भाविकांचे श्रध्दास्थान पाण्याखाली जाणार असल्याचे स्पष्ट होताच भाविकांच्या मागणीला प्रतिसाद देत महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांच्या माध्यमातून शासन स्तरावर योग्य निर्णय घेऊन सदर बंधाऱ्याची उंची कमी करुन पाण्याखाली जाणारे हे पुरातन देवस्थान वाचविण्यात यशस्वी झाल्यानंतर या ठिकाणच्या विकास प्रक्रियेला गती देवून आज एक अलौकिक सोहळा आपण सर्वांच्या उपस्थितीत संपन्न करता आल्याबद्दल श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी ही श्री भिवाई देवीची कृपा असल्याचे निदर्शनास आणून दिले.

आगामी काळात हे तीर्थ क्षेत्र नावारुपाला येईल यासाठी सर्वांनी एकजुटीने जाती पाती, राजकारणा पलीकडे जाऊन कार्यरत राहण्याची गरज श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी स्पष्टपणे नमूद केली.


कलशारोहणामुळे मंदिराला परिपूर्णतः लाभल्याचे नमूद करीत 'ब' तीर्थक्षेत्र दर्जा लाभल्याने शासन स्तरावरुन पुरेसा निधी उपलब्ध करुन घेऊन या तीर्थक्षेत्राचा उर्वरित विकास पूर्णत्वास नेण्याची ग्वाही देत भक्त मंडळींची अखंडित साथ लाभावी अशी अपेक्षा आ.दिपकराव चव्हाण साहेब यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली.

पूर्वी देवीच्या दर्शनाला येताना एक कि.मी.अंतरावर गाडी उभी करुन महाकाय खडकातून रस्ता काढीत दर्शन करावे लागत असे त्या पार्श्वभूमीवर येथील विश्वस्त मंडळींनी घेतलेली अपार मेहनत आणि भक्त मंडळींची सक्रिय साथ यामुळेच श्री भिवाई देवी आणि धुळोबा देवस्थानांच्या विकास कामांना गती प्राप्त झाल्याचे नमूद करीत आगामी काळातील विकास कामांना अधिक गती देताना विकास आराखडा तयार करावा त्यामध्ये नदीला विस्तीर्ण घाट बांधावा, वार्षिक यात्रेसाठी हा परिसर पुरेसा नसल्याने लगतची मोठी जागा यात्रेसाठी तात्पुरत्या स्वरुपात राखीव ठेवून तेथे यात्रेचे नियोजन करावे वगैरे सूचना माजी आमदार प्रकाश शेंडगे साहेब यांनी यावेळी केल्या.

 या पुरातन देवस्थान पर्यंत रस्त्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी यशवंत ग्रामसमृध्दी योजनेतून निधीची तरतूद करताना लागणारा ग्रामस्थांचा सहभाग निधी श्रीमंत संजीवराजे (बाबा) यांनी उपलब्ध करुन दिला तर तत्कालीन गटविकास अधिकारी राजेंद्र कोकरे यांनी एका रात्रीत तो प्रस्ताव तयार करुन घेऊन मंजूर करुन घेतल्याने आज रस्त्याची सुविधा उपलब्ध झाल्याचे नमूद करीत जीर्णोद्धार व कलशारोहण हे अत्यंत कठीण काम केवळ भक्त मंडळींच्या सक्रिय साथीने पूर्ण झाले. मंदिराच्या दगडी चौकटी बालाजी देवस्थान येथून आणल्या आहेत तर तांब्याच्या कळसाला सुमारे १८ लाख रुपये किमतीच्या ३२२ ग्रॅम सोन्याचा मुलामा देण्यात आला, परिसराला शोभेल अशी शिखराची उंची आणि परिसर विकास ही कामे सर्वांनी केलेल्या आर्थिक व सक्रिय साथीमुळेच शक्य झाल्याचे नमूद करीत देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल साहेबराव भिसे सर यांनी स्पष्टपणे नमूद करीत सर्वांना धन्यवाद दिले.

     प्रारंभी शंकरराव माडकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व प्रमुख पाहुण्यांचे सत्कार केल्यानंतर प्रास्ताविकात मंदिर जीर्णोद्धार व कलशारोहण पूर्णत्वास जाण्यास २०/२२ वर्षे लागली, मार्च २००० मध्ये या मंदिर जीर्णोद्धार व शिखर आणि कलशारोहण संकल्प करण्यात आला त्यानंतर सर्वांनी अविरत मेहनत घेतली भक्त मंडळींनी १०१ रुपयांपासून लाख रुपयांपर्यंत देणग्या दिल्या मुळेच हे मोठे काम पूर्णत्वास गेल्याचे सांगितले.
    कोलवडकर यांनी सूत्र संचालन आणि प्रा.रविंद्र कोकरे यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad