मुंबईत कार्यालय बांधून राजकीय हस्तक्षेप करण्याचा योगी आदित्यनाथ यांचा प्रयत्न - महेश तपासे
मुंबईत कार्यालय बांधून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून राजकीय हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न होत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी माध्यमांसमोर मांडले. यावेळी महाराष्ट्रात राहणाऱ्या उत्तर भारतीयांना योगींवर किती विश्वास आहे याची कल्पना नाही, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
राजद्रोह कायद्यावर फेरविचार करावा ही राष्ट्रवादीची सुरुवातीपासूनची भूमिका
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार साहेब यांनी १२४/अ या राजद्रोहाच्या कायद्यावर फेरविचार करावा ही मागणी वेळोवेळी केली होती. या कायद्याला आज सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. या निर्णयाचे महेश तपासे यांनी स्वागत केले. भारतीयांनी ब्रिटीशांविरोधात बंड करू नये यासाठी ब्रिटीशांनी हे कलम आणले होते. दुर्दैवाने या कायद्याचा गैरवापर अनेक ठिकाण होत असतो. देशात साडेपाचशे केसेस या राजद्रोहाशी संबंधित आहेत. याचा गैरवापर होऊ नये यासाठी पुनर्विचाराची आदरणीय पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुरुवातीपासूनच मागणी होती असे तपासे म्हणाले.
तसेच राणा दाम्पत्यावर लावलेल्या राजद्रोहाच्या गुन्ह्याबाबत प्रश्न केला असता ते म्हणाले की, “जोपर्यंत कायदा आहे तोपर्यंत त्याच्या अधीन राहून कलम लावणे हे पोलिसांचे काम आहे. उद्या हा कायदा नसेल तेव्हा त्याअंतर्गत आरोप पोलिसांकडून लावले जाणार नाहीत.”