आम्ही रांजाळेकर विकास फाउंडेशन संचालित वाचनालयचे उदघाटन
जवळा बाजार येथून जवळच असलेल्या रांजाळा येथे सर्व रांजाळेकर पदसिद्धपणे सदस्य असलेल्या व ज्याचा कोणीही अध्यक्ष नाही किंवा कोणी एक विशिष्ट व्यक्ती प्रमुख नाही अश्या महापुरुषांचे विचार प्रत्यक्षात उतरवण्यासाठी नैतिकतेच्या आधारावर गावाच्या सर्वांगीण व सर्वसमावेशक विकासासाठी रांजाळेकरांनी बनवलेल्या "आम्ही रांजाळेकर विकास फाउंडेशन" मार्फत काल दिनांक 9 मे 2022 रोजी सकाळी अभिनव व अनुकरणीय अशी पुस्तक दिंडी व रात्री साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त जेष्ठ साहित्यिक व पत्रकार आसारामजी लोमटे यांच्या हस्ते वाचनालयाचे उदघाटन व प्रबोधन अश्या गावाला आदर्शाकडे वाटचाल करण्याची सकारात्मक दिशा देणाऱ्या उपक्रमाचे आयोजन केले होते.
त्यामध्ये सकाळी सात वाजता गावामध्ये मुले-मुली व गावकरी बंधू-भगिनींनी फुलांनी सजवलेल्या पालखी मध्ये भारताचे संविधान, शिव-फुले-शाहू-आंबेडकर महापुरुषांचे विचार देणारी पुस्तके त्यासोबत शेती, विज्ञान व इतर विषयाची पुस्तके ठेवण्यात आली. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांच्या हातामध्ये नैतिक गोष्टींची, विज्ञान, भूगोल, शेती, उद्योग इ. माहितीची, स्पर्धा परीक्षानां उपयुक्त पुस्तके अश्या विविध विषयांची अतिशय दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व चांगल्या लेखकाचे अशी 400 पुस्तके हातात घेतली होती. अशी पुस्तके हातात घेतलेली व भारताचे संविधान पालखीमध्ये ठेवलेली दिंडी गावातील आपुलकी नगर, जिव्हाळा नगर व बंधुता नगर या तिनही नगरांमधून आम्ही रांजाळेकर, पुस्तके वाचु-उच्चशिक्षित होवू, माझं गाव-माझं तीर्थ या व इतर प्रेरणादायी घोषणांनी उत्साहपुर्ण वातावरणात पार पडली. पुस्तक दिंडीचे ठिकठिकाणी महिलांनी, नागरीकांनी स्वागत केले. ही विचारांची क्रांती आणणारी पुस्तक दिंडी रांजाळ्यासोबतच इतर सर्व गावांसाठी नवी दिशा देणारी आहे. सर्वांच्या मंगलाची कामना करणाऱ्या विपश्यनेच्या प्रार्थनेने या अभिनव दिंडीचा शेवट झाला.
सायंकाळी या आम्ही रांजाळेकर विकास फांऊडेशन संचलित वाचनालयाचे उदघाटनाचे कार्यक्रमात आसारामजी लोमटे सर म्हणाले की, *"ज्यांच्या हाती असतील पुस्तक त्यांचे होईल सशक्त मस्तक"* पुढे बोलताना ते म्हणाले की, *"आजच्या डिजिटल युगात वाचन संस्कृती हारवत चालली असुन तिचे जतन करण्यासाठी ग्रामीण भागात वाचन चळवळ निर्माण करण्याच्या हेतुने युवकांनी पुस्तकात समरस व्हावे व त्यांच्या वैचारीक प्रगल्भतेकडे वाढ व्हावी".
'माणसाने माणसाशी माणसासम वागणे' या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली तर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी डाॅ शेलगावकर, अॅड. किरण दैठणकर, पत्रकार सुरेश किर्तने, राहुल वाघमारे, रामेश्वर हलगे व गावातील लहान मुल-मुली व ग्रामस्थ उपस्थित होती.
हा रांजाळा गावचा आदर्श सर्व गावानीं घेतल्यास महापुरुषांच्या स्वप्नातील "ज्ञानाधारित समाजरचना व स्वतःचा विवेक जागा ठेवून वागणारा माणूस " घडविण्याचे स्वप्न सत्यात उतरण्यास काही वेळ लागणार नाही.