महागाईमुळे पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना अपयशी
मोठा गाजावाजा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेची सुरुवात केली. देशातील कोट्यवधी गृहिणी चुलीसमोर बसून स्वयंपाक करतात. या गृहिणींना धुरामुळे अनेक आजारांचा सामना करावा लागतो, असे सांगून पंतप्रधानांनी ही योजना सुरु केली. त्याच्या जाहिरातीवरही हजारो कोटी खर्च केले. मात्र गॅस दरवाढीमुळे ही योजना आता पूर्णपणे अपयशी ठरली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी मिळवलेल्या माहितीनुसार देशात ९० लाख ग्राहकांनी मागच्या आर्थिक वर्षात एकदाही गॅस सिलींडर खरेदी केलेला नाही. तर एक कोटी आठ लाख ग्राहकांनी फक्त एक सिलींडर खरेदी केला.
भारताशेजारी असलेल्या श्रीलंका देशात महागाईमुळे लोक रस्त्यावर येऊन सरकारच्या विरोधात उग्र आंदोलन करत आहेत. भारतात देखील महागाईने उच्चांक गाठला असून सामान्य जनता महागाईने त्रस्त आहे. त्यामुळेच पंतप्रधानांची महत्त्वाकांक्षी योजनाही अपयशी ठरण्याच्या मार्गावर आहे. केंद्र सरकारने वेळीच यातून धडा घेतला नाही तर महागाईचा भस्मासूर अधिक उग्र रूप धारण करणार आहे.