फलटणमध्ये सर्व समावेशक शिवजयंती महोत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न करणार - श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर
फलटण प्रतिनिधी :- विकास बेलदार
यंदाचा छत्रपती शिवजयंती महोत्सव सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य खो - खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर ( बाबा ) यांनी दिली आहे.
आज सायंकाळी ७ वाजता महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती मा. ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ( महाराजसाहेब )यांच्या " लक्ष्मी विलास " या निवासस्थानी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते . यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे पुढे म्हणाले की, फलटण तालुक्यामध्ये शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याच्या दृष्टीने शहरातील व तालुक्यातील सर्वच जण पुढे आले आहेत. त्यामुळे यंदाचा शिवजयंती महोत्सव या सर्वांना एकत्रित बरोबर घेऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वी दोन वेळा फलटण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष कै. नंदकुमार भोईटे यांनी सर्वांना बरोबर घेऊन हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला तीच परंपरा पुढे नेण्यासाठी फलटण मधील अनेक युवक माझ्याकडे आले तसेच श्रीमंत रामराजे महाराजसाहेब , श्रीमंत रघुनाथराजे बाबा यांच्याकडे गेले व त्यांनी हि शिवजयंती महोत्सवाची महत्वाची परंपरा पुढे नेण्यासाठी आग्रह धरला आणि म्हणूनच हा निर्णय तुम्हा सर्वांना बरोबर घेऊन तसेच सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून राजकारण विरहित असा आगळा वेगळा शिवजयंती महोत्सव साजरा करण्याचे ठरले असल्याचे सांगून श्रीमंत संजीवराजे म्हणाले हा उत्सव राजकारण विरहित व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रेम व्यक्त करणारा व त्यांचे विचार पुढे नेहणारा असल्याचे हि शेवटी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर ( बाबा ) यांनी सांगितले.