मार्केटमध्ये आधीच इतक्या प्रमाणात दारुची दुकानं आहेत, त्यात तुम्ही आणखी वाढवत आहात, तुम्हाला सर्वच लोकांना व्यसनाधीन बनवायचं आहे का?, असा प्रश्न अण्णा हजारेंनी राज्य सरकारला विचारला आहे. लोकं व्यसनाधीन झाले की राज्य सरकारला जे साधायचं असेल ते साधता येईल, म्हणून हा निर्णय घेतल्याची टीका त्यांनी केली. तसेच बालकं जर दारूच्या आणि वाइनच्या अधीन गेलीत तर आपल्या देशाचं काय होईल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
“मी सरकारला निरोप पाठवला. मग त्यांची लोकं चर्चेसाठी आलीत. मी त्यांना फक्त एवढंच म्हटलं की तुमचं मी सगळं ऐकलंय, आता तुम्ही सरकारला माझा एक निरोप पाठवा की तुमच्या राज्यात मला जगायची इच्छा राहिलेली नाही. एक्साईज विभागाचे आयुक्त मला भेटायला आले. पण मला त्यांच्यावर विश्वास नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात वाइन आमची संस्कृती नाही. तुम्ही त्याची खुल्याने विक्री करताय, ते पाहून मला या सरकारच्या राज्यात जगायची इच्छाच उरलेली नाही,” असं अण्णा म्हणाले.
“महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी किर्तनकार किर्तन करतात. पण सरकार किराणा दुकानात वाइन ठेवून ते क्षणात धुळीस मिळवत आहात. हे सर्व बघून आता जगण्याची इच्छा होत नाही. आयुष्याची ८४ वर्ष झालीत, तेवढी पुरेशी आहेत,” असं म्हणताना अण्णा हजारे यावेळी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, एक्साइज विभागाच्या राज्य सचिवांनी पुढचे निर्णय लोकांना विचारल्याशिवाय घेणार नाही, असं लिखीत स्वरुपात दिल्याचं अण्णा हजारेंनी सांगितलं. ‘उद्यापासून मी प्राणांतिक उपोषण करणार आहे’, असं अण्णा म्हणाले.