१३ कोटी १२ लाख खर्च करुन विश्रामगृहाचं विस्तारीकरण करण्यात येणार आहे. १ व्हीव्हीआयपी कक्ष, २ व्हीआयपी कक्ष व ५ साधारण कक्ष बांधण्यात येणार आहेत. तसंच मल्टीपपर्ज हॉल, डायनिंग व किचन याबरोबरच स्वागत कक्ष, प्रतिक्षा कक्ष, एव्ही रुम, स्टोअर रुमची सुविधा असणार आहेत.
विस्तारीत विश्रामगृह सातारा शहराच्या वैभवात भर घालेल. साताऱ्याचे सैनिक स्कूल हे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून सुरु झाले आहे. या सैनिक स्कूलच्या सोयी-सुविधा वाढवण्यासाठी प्रत्येक वर्षी १०० कोटी याप्रमाणे ३०० कोटी देण्यात येणार आहे.
सैनिक स्कूल येथे कोणत्या प्रकारच्या सोयी-सुविधा निर्माण करावयाच्या आहेत, त्याबाबत पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली वेळोवेळी बैठका घेऊन त्याबाबतचे प्रस्ताव सादर करावेत, असं सूचित केलं. सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा बांधकाम आराखडा चांगल्या पद्धतीनं करावा.
महाविद्यालय चांगल्या प्रकारे कसं उभं राहिल, यासाठी मी स्वत: लक्ष घालीन. तसंच स्थानिकांनीही यासाठी सहकार्य करावं. महाविद्यालयाच्या उभारणीसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सातारा संस्थेसाठी स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे मध्यवर्ती प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. या प्रयोगशाळेच्या उभारणीला १२ कोटी ९९ लाख इतका खर्च करण्यात येणार आहे. या प्रयोग शाळेत म्युझियम, व्याख्यान कक्ष, डेमो रुम, विभाग प्रमुखांसाठी कक्ष अशा सुविधा असणार आहेत.