फलटण प्रतिनिधी
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेलनं निर्विवाद वर्चस्व मिळवलं. त्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता ताणली होती. राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची ओळखली जाणारी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी माजी खासदार कै. लक्ष्मणराव पाटील उर्फ तात्या यांचे पुत्र नितीन लक्ष्मणराव पाटील यांची जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली, तर उपाध्यक्षपदी अनिल देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिलीय.रामराजे म्हणाले, प्रथेप्रमाणे आज जिल्हा बॅंक अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवडणूक बिनविरोध करण्यात आली. त्यामुळं आता पॅनलचा विषय संपलाय. आतलं-बाहेरचं सगळंच संपलंय. आपली जिल्हा बॅंक आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी जाईल, याकडं लक्ष देणार असून जगातील रोबो बॅंकेशी तुलना व्हावी, यासाठी सर्व सहकाऱ्यांचं पाठबळ मिळावं. दरम्यान, निवडणुकीत बरंच काही घडून गेलंय, असं म्हणत रामराजेंनी आता त्या विषयाकडं न जाता बॅंकेच्या प्रगतीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असं त्यांनी आवाहन केलं. शिवेंद्रसिंहराजेंनी मनाचा मोठेपणा दाखवून हे सगळं घडवून आणलंय. त्यांचं मी आभार मानतो, असंही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले.
आज सकाळी अकरा वाजता जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये सर्व संचालकांची बैठक घेण्यात आली. यामध्ये विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, माजी अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.