मार्मगोवा हे भारतीय नौदलाच्या प्रकल्प 15B श्रेणीमधील दुसरी विनाशिका, गोवा मुक्ती दिनी आपल्या पहिल्या सागरी चाचण्यांसाठी रवाना
मार्मगोवा हे भारतीय नौदलाची P15B श्रेणीमधील दुसरी स्वदेशी स्टिल्थ विनाशिका असून ती 2022 सालच्या मध्यावर कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे .ती आज तिच्या पहिल्या सागरी प्रवासाला निघाली आहे. या जहाजाच्या सागरी प्रवासाचा आरंभ करण्यासाठी 19 डिसेंबर ही सर्वात योग्य तारीख आहे कारण पोर्तुगीज राजवटीपासून मुक्त झाल्याचा आज 60 वा वर्धापन दिन गोवा राज्य साजरा करत आहे. भारतीय नौदलाने या मुक्तीसंग्रामामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि या जहाजाला गोवा या सागरी राज्याशी संबंधित नाव देऊन ती समर्पित केल्याने भारतीय नौदल आणि गोव्यातील लोक यांच्यातील संबंध वृध्दिंगत तर होतीलच, शिवाय नौदलाच्या राष्ट्र उभारणीतील महत्त्वपूर्ण भूमिकेशी जहाजाचे कायमस्वरूपी नाते जोडले जाईल.
मार्मगोवा जहाज हे माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDSL) येथे बांधणी होत असलेल्या प्रकल्प 15B श्रेणीमधील एक विनाशिका आहे. या जहाजामध्ये वैशिष्टपूर्ण, सुयोग्य अशा स्वदेशी तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे आणि ते आत्मनिर्भर भारताचे एक दैदिप्यमान उदाहरण आहे. या जहाजाने 'मेक इन इंडिया' या उपक्रमाला उभारी आणि प्रोत्साहन दिले आहे.
मार्मगोवा भारतीय नौदलाच्या लढाऊ क्षमतेत लक्षणीय भर घालेल. अलिकडेच नोव्हेंबर 2021 मध्ये आयएनएस विशाखापट्टणम (INS, Visakhapatnam) आणि चौथी P75 पाणबुडी आयएनएस वेला (INS Vela) कार्यान्वित झाल्यामुळे, मार्मगोवाच्या सागरी चाचण्यांची सुरुवात ही एमडीएसएल (MDSL) च्या अत्याधुनिक क्षमता आणि आधुनिक आणि बहुआयामी भारताच्या स्वदेशी मजबूत जहाज बांधणीच्या परंपरेची साक्ष आहे.