जागतिक स्तनपान सप्ताह उत्साहात साजरा
पिंपरी - डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रामध्ये बालरोग विभाग व यशोदा माता दुग्ध पेढीच्या संयुक्त विद्यमानाने दि १ ते ७ ऑगस्ट जागतिक स्तनपान सप्ताह साजरा झाला. ‘स्तनपानाचे संरक्षण: ही सामूहिक बांधिलकी’ या घोषवाक्याच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जनजागृतीपर वेबिनार, तज्ञांची व्याख्याने, समुदाय जनजागृती, पथनाट्य, भिंती पत्रके, इ पोस्टर्स, प्रश्नोत्तर सत्र, वादविवाद स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आले. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन कार्यक्रमाचा उत्साह वाढविला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन विश्वस्त डॉ. यशराज पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी यशोदा माता दुग्ध पेढीची जनजागृतीपर ध्वनी चित्रफित प्रदर्शित करण्यात आली आणि या सप्ताहाची उत्साहात सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना डॉ. शैलजा माने यांनी माता दुग्ध पेढीचा वार्षिक मागोवा सादर केला या वर्षात १४००० बालकांनी माता दुग्ध पेढीद्वारे लाभ घेतला तर १३००० मातांमार्फत स्वयंमस्फुर्तीने ३२०० लिटर इतके विक्रमी दुधाचे संकलन झाले तसेच फिरत्या यशोदा अमृतवाहिनी द्वारे १७० लिटर दूध पुण्याच्या परिघातून प्राप्त झाले आणि एक ही बालक मातेच्या दुधापासून वंचित राहिले नाही हेच आमच्या यशाचे गमक आहे असे त्या म्हणाल्या.
कोरोनाच्या या भीषण परिस्थितीती इतर बालकांसाठी दुग्धदान केलेल्या मातांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत त्याचे हे समाजाप्रतीचे योगदान सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. यातील सौ. नीता पलारिया व सौ. चिन्मयी भाटे या दोन्ही मातांनी वयक्तिक रित्या सर्वाधिक दूध दुग्ध पेढीत दान केले त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला तसेच कोरोना काळात अविरत काम करण्याऱ्या योगिता गायकवाड व छाया जावळे या दोन परिचारिकांचा सन्मान आणि विविध स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
वैद्यकीय व नर्सिग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मराठी व हिंदीतुन सादर केलेल्या पथनाट्याला प्रेक्षकांनी दाद दिली, विविध स्पर्धेत सहभागी विद्यार्थी स्तनपान विषया संदर्भात मोकळ्या मनाने आपल्या भावना प्रकट करताना दिसले. विद्यार्थ्यांनी रंगविलेल्या भित्तीपत्रकाचे प्रदर्शन महाविद्यलयात लावण्यात आले आहे.
सन्मानित करण्यात आलेल्या सर्वांचे डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी कौतुक केले ते आपल्या संदेशात म्हणाले "स्तनपान सप्ताहाची जागरूकता आठवड्या पुरती मर्यादित न राहता ती अशी अविरत राहावी असा संकल्प सर्वानी करावा".
"आईचे दूध अत्यंत महत्त्वाचे असून ते अमृता समान आहे, त्यामुळे बाळाचे आरोग्य सुधारण्यासाठी व कुपोषणावर मात करण्यासाठी स्तनपान करणे गरजेचे आहे, असे मत प्र-कुलपती डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांनी व्यक्त केले" त्या पुढे म्हणाल्या "ही केवळ आईचीच नाही तर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे. आमची अद्ययावत मिल्क बँक प्रायव्हेट पब्लिक असून ती देशात अग्रेसर ठरली आहे तसेच देशातील पहिले असे खाजगी रुग्णालय आहे की, ज्याला शिशु मैत्री रुग्णालय अर्थात बेबी फ्रेंडली हॉस्पिटल असे नावलौकिक प्राप्त झाले आहे. आणि ते जनहितार्थ सदैव कार्यरत आहे" याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
"सामाजिक जबाबदारी चे भान ठेऊन असे उपक्रम सातत्याने राबवित असून बालरोग विभाग व यशोदा माता दुग्ध पेढी बालकांचे आरोग्य व पोषणासाठी कायमच आग्रही असते तसेच माता दुग्ध पेढीसाठी रॉटरी क्लब ऑफ निगडीचे ही भक्कम पाठबळ आम्हाला लाभले आहे' असे मत विश्वस्त डॉ यशराज पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
“प्रामुख्याने सांगायचे तर आईच्या दुधाचा मुलाच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी खूप फायदा होतो. कारण त्यात सर्व पोषक घटक असतात जे मुलांना निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असतात. तर स्तनपान करणाऱ्या आईसाठी देखील अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. स्तनपान करणाऱ्या स्त्रियांना स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग आणि मधुमेह यासारख्या रोगांचा धोका कमी असतो" असे मत बालरोग विभाग प्रमुख डॉ.शरद अगरखेडकर यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाप्रसंगी प्र-कुलपती डॉ. भाग्यश्रीताई पाटील, विश्वस्त डॉ.यशराज पाटील, बालरोग तज्ञ् संघटनेचे सचिव डॉ.प्रमोद कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमरजित सिंग, अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर, शैक्षणिक विभागाच्या संचालिका डॉ. वत्सला स्वामी, बालरोग विभाग प्रमुख डॉ.शरद अगरखेडकर प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संपदा तांबोळकर तर आभार प्रदर्शन डॉ. रसिका भारसवाडकर यांनी केले.