जयपूर (भानुदास गायकवाड)
जयपूर- राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची राजस्थानमधील जयपूर येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जयपूर येथील निवासस्थानी असताना अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या घालून हत्या केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
गोगामेडी यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर परिसरात मोठ्या संख्येने लोक जमले होते. गोगमेडी यांच्यावर नेमका कोणी गोळीबार केला, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सुखदेव सिंह गोगामेडी हे अनेक वर्षांपासून राष्ट्रीय राजपूत करणी सेनेशी जोडले गेलेले आहेत. राजपूत करणी सेनेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष होते. पद्मावत आणि गॅगस्टर आनंदपाल एनकाऊंटर प्रकरणानंतर गोगामेडी चर्चेत आले होते. सुखदेव सिंह यांची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलीस अलर्ट झाले आहेत. तसेच इतर शहरातही अलर्ट जारी करण्यात आला आहे. राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षांवर कोणी गोळीबार केला, याबद्दल माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे.