पक्ष चिन्ह गोठावलं...तर आज ठरणार पक्षाचे नाव-चिन्ह
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले...
निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह गोठवलं आहे.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळं आता दोन्ही पक्ष आता धनुष्यबाण चिन्ह वापरू शकणार नाही. मात्र शिंदे गटासाठी ही जमेची बाब ठरू शकते. शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत दोन्ही गटाला निवडणूक आयोगाला पर्याय द्यायचे आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरुन गेल्या अनेक दिवसांपासून सुनावणी सुरु होती. निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ दिला होता. शिंदे गटाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडे लवकरात लवकर याबाबतचा निकाल मार्गी लावावा, अशी मागणी केली होती.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं होतं. तर ठाकरे गटाकडून आपण सगळे कागदपत्रे सादर करु, पण आपल्याला पुरेसा वेळ द्यावा, अशी मागणी केली होती. विशेष म्हणजे काल निवडणूक आयोगाच्या सुनावणीत देखील शिवसेनेकडून तीन आठवड्यांचा वेळ मागवण्यात आला होता.
निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला खडेबोल सुनावले होते. त्यानंतर दोन्ही गटासाठी 24 तासांचा वेळ देण्यात आला होता. अखेर या प्रकरणी निवडणूक आयोगाची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सलग चार तास बैठक झाली. या बैठकीनंतर निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला.
पक्ष चिन्ह गोठावलं...तर आज ठरणार पक्षाचे नाव-चिन्ह
निवडणूक चिन्हावरून महाराष्ट्रात ठाकरे गट आणि शिंदे गटात सुरू असलेल्या लढतीवर निवडणूक आयोगाने आपला निकाल दिला आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना पक्षाचे नाव आणि बाणाचे चिन्ह वापरण्यास बंदी घातली आहे. आता या निर्णयानंतर ठाकरे गटातून याविरोधात आवाज उठू लागला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाने हा निर्णय अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्षात जूनमध्ये शिवसेनेचे दोन तुकडे झाले, एक उद्धव ठाकरे आणि दुसरा एकनाथ शिंदे. यानंतर दोन्ही गटात स्वतःलाच खरी शिवसेना म्हणण्याची स्पर्धा सुरू झाली. यासोबतच पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हावर दोघेही दावा करत होते. निवडणूक आयोगाच्या निर्णयाने हा गोंधळ निश्चितच संपुष्टात आला आहे.
मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभेसाठी ३ नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाला पक्षाच्या चिन्हावर निर्णय घ्यायचा होता, त्याअंतर्गत आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, या पोटनिवडणुकीत दोन्ही गटांपैकी कोणालाही शिवसेनेचे नाव आणि बाण वापरण्याची परवानगी नाही.
ठाकरेंचे निष्ठावंत असलेले महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, पोटनिवडणुकीसाठी अंतरिम आदेश देण्याऐवजी निवडणूक आयोगाने एकत्रित निर्णय घ्यायला हवा होता. ते म्हणाले, हा अन्याय आहे.
आम्ही लढू आणि जिंकू - आदित्य ठाकरे
निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी ट्विट केले की, ‘शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवण्याचे लज्जास्पद कृत्य देशद्रोह्यांचे. ते म्हणाले, आम्ही लढू आणि जिंकू. आम्ही सत्याच्या पाठीशी आहोत. सत्यमेव जयते!
नाव आणि निवडणूक चिन्हावर दोन्ही गटांनी केलेल्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाने अंतरिम आदेश जारी करून दोघांनाही आपापल्या पक्षांसाठी सोमवारपर्यंत तीन नवीन नावे आणि चिन्हे सुचवण्यास सांगितले आहेत. आयोग त्यांना दोन्ही गटांनी सुचविलेली नावे आणि चिन्हे वापरण्याची परवानगी देईल.
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले...
शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं आहे. शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. निवडणूक आयोगानं शिवसेना नाव वापरण्यासह धनुष्यबाण चिन्ह हे अंधेरी पोटनिवडणुकीसाठी तात्पुरते गोठविण्याचा निर्णय दिल्यानंतर यातील कायदेशीर बाबी काय? यावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिलीय.
राज्य निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष व त्याच्या चिन्हाबाबत दिलेल्या निर्णयावर राज्याचे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिलीय. निवडणूक आयोगाचा हा अंतिम निर्णय नाही, दोन्ही पक्षांकडून पुरावे सादर करणे, लागणारा युक्तिवाद या गोष्टींना बराच कालावधी लागू शकतो, त्यामुळे अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक लक्षात घेता, निवडणूक आयोगानं हे तात्पुरते आदेश दिल्याचं उज्ज्वल निकम म्हणाले.
उज्ज्वल निकम म्हणाले, या निर्णयाविरुद्ध दोन्ही गटांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येऊ शकते, दोन्ही गटांना अंधेरी विधानसभेच्या निवडणुकीसाठी तर उमेदवार उभे करावयाचे असतील तर ते निवडणूक आयोगाच्या निकालाला दोन्ही गटांना आव्हान देता येणार आहे, शिवसेना पक्ष व त्याचे चिन्ह याबाबत निकाल देण्यास निवडणूक आयोगाला वेळ लागू शकतो. साधारणपणे सहा महिन्यात निवडणूक आयोगाकडून निकाल देणं अपेक्षित असतं, निवडणूक आयोगापुढे दोन्ही गटाकडून प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहेत. आता तोंडी पुरावा काय सादर केला जातो या दोन्ही गोष्टी लक्षात घेता निवडणूक आयोगाचा निकाल तसेच शिवसेना पक्ष व त्याचे चिन्ह याबाबत भवितव्य हे ठरेल असेही यावेळी उज्वल निकम यांनी सांगितले.
शिवसेना नावच वापरता येणार नाही का? याबाबत यापूर्वीच अशा प्रकारांमध्ये दिलेले निकाल अभ्यासावे लागतील तसेच शिवसेना नावाच्या पुढे आणि मागे काहीतरी शब्द घालून ते दोन्ही गटांना वापरता येऊ शकतं असं मतही यावेळी उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलं. सोमवारपर्यंत दोन्ही गटांना त्यांची मान्यता चिन्ह कोणती आहेत? याची निवड करावी लागेल असेही यावेळी उज्ज्वल निकम म्हणाले.
दरम्यान हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपाचा असल्याची माहिती आहे. केवळ अंधेरी पोटनिवडणुकीकरता हा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत नव्या चिन्हासाठी दावा करण्याचे निर्देशही आयोगाकडून देण्यात आलेत. शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय द्यायचे आहेत, अशी माहिती मिळाली आहे.