महाराष्ट्रात बत्ती गुल होण्याची शक्यता ? वीज कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याच्या मार्गावर
मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असून अद्यापही यावर तोडगा निघालेला नाही. यामुळे जनतेचे प्रचंड हाल होताय. त्यातच आता वीज वितरण कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पुढच्या 2 ते 3 दिवसांत महाराष्ट्रात बत्ती गुल होण्याची शक्यता असल्याने राज्यावर नवीन संकट उभे राहिली आहे.
काल म्हणजेच सोमवारपासून सुरू झालेला वीज कर्मचाऱ्यांचा संप आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खाजगीकरण आणि कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ सोमवारपासून (28 मार्च) अनेक संघटनांनी राज्यात संप पुकारला आहे.
या संपामध्ये बँक कर्मचाऱ्यांसोबत महावितरण कर्मचारी देखील सामील झाले आहेत. यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील अनेक भागांना त्याचा फटका सहन करावा लागला.
वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी ऊर्जामंत्र्यांसोबत मुंबईत काल बैठक झाली. पण ती बैठक निष्फळ ठरली आहे. तसेच आज (मंगळवारी) ऊर्जामंत्र्यांसोबत होणारी बैठकही रद्द करण्यात आली आहे.
वीज निर्मिती आणि कोळसा पुरवठा करणाऱ्या अनेक केंद्रांवरच्या संघटनांनी संप पुकारल्यानं विजेचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कोयना धरणाचं पायथा विद्युतगृह बंद पडलं आहे. त्यामुळं संपावर तोडगा न निघाल्यास राज्यात वीजटंचाई होण्याच्या मार्गावर आहे.