Type Here to Get Search Results !

ऑस्ट्रेलियाचा फिलिपाईन्सविरुद्ध दणदणीत विजय

ऑस्ट्रेलियाचा फिलिपाईन्सविरुद्ध दणदणीत विजय
मुंबई २४ जानेवारी २०२२: अंधेरी येथील मुंबई फुटबॉल अरेना स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाने फिलिपाईन्सचा ४-० गोलने धुव्वा उडवत दिमाखात एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

ऑस्ट्रेलियाला जागतिक क्रमवारीत आपल्याहून ५३ स्थानांनी मागे असलेल्या फिलिपाईन्स संघाविरुद्ध पहिला गोल करण्यासाठी ५१व्या मिनिटापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. मात्र, अखेर ऑस्ट्रेलियाने समांथा केर, एमिली वॅन एगमंड आणि मेरी फॉलर यांनी केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर बाजी मारली.

फिलिपाईन्सच्या डॉमनिक रँडलनेही एक स्वयंगोल करत ऑस्ट्रेलियाच्या विजयात हातभार लावला. दोन सामन्यांतून सहा गुणांची कमाई करत ऑस्ट्रेलियाने अव्वल आठ संघांमधील स्थान जवळपास निश्चित केले आहे. त्याचप्रमाणे, या पराभवानंतरही थायलंडविरुद्धच्या विजयाच्या जोरावर फिलिपाईन्सनेही बाद फेरीत स्थान मिळवण्याच्या आशा कायम राखल्या आहेत. तीन दिवसांपूर्वी इंडोनेशियाविरुद्ध  १८-० गोलने  विक्रमी विजय मिळवून ऑस्ट्रेलिया संघाने मुंबईत येत संभाव्य विजेत्यांप्रमाणे खेळ केला. ऑस्ट्रेलियाने एकही गोल न स्वीकारता विजय मिळवला असला, तरी त्यांना फिलिपाईन्सने काहीप्रमाणात झुंजवले.


थायलंडविरुद्धच्या विजयात मोलाचे फिलिपाईन्सकडून निर्णायक खेळ केलेल्या चँडलर मॅकडॅनियलकडून अपेक्षित खेळ झाला नाही. सरिना बोल्डेनने गोल करण्याची सुवर्ण संधी निर्माण केली होती, मात्र यावर मॅकडॅनियलला गोल करण्यात यश आले नाही.


सामन्याच्या सुरुवातीलाच मिळालेल्या या धक्क्यानंतर ऑस्ट्रेलियाने स्वत:ला सावरले आणि चेंडूवर अधिक नियंत्रण मिळवताना काहीसा बचावात्मक पवित्रा घेत फिलिपाईन्सच्या खेळाचा अंदाज घेतला.


३०व्या मिनिटाला स्टेफ कॅटलीच्या कॉर्नर किकवर केरने हेडरद्वारे गोल करण्याची संधी गमावली. यानंतर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाला गोल करण्याची संधी मिळाली, पण त्यांना फिलिपाईन्सचा बचाव भेदता आला नाही. फिलिपाईन्सने ऑस्ट्रेलियाचा धडाका रोखण्यात यश मिळवल्याने पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत सुटले. यावेळी ऑस्ट्रेलियाने तब्बल दहावेळा गोलजाळ्याचा वेध घेतला, पण त्यांना फिलिपाईन्सकडून पदार्पण करणारी गोलकीपर कियारा फाँटनिलाचा बचाव भेदता आला नाही.


पहिल्या सत्रात फिलिपाईन्सकडून मिळालेली अनपेक्षित झुंज ऑस्ट्रेलियासाठी बुस्टर ठरली आणि त्यांनी वेगवान खेळ करत आपला दणका दिला. ५१व्या मिनीटाला कॅटलीने केलेल्या कॉर्नर किकवर केरने कोणतीही चूक न करता शानदार गोल करत ऑस्ट्रेलियाला १-० गोल असे आघाडीवर नेले. यानंतर केवळ दोन मिनिटांनी ऑस्ट्रेलियाची आघाडी २-० गोल अशी झाली. यावेळी फिलिपान्सच्या रँडलकडून झालेल्या स्वयंगोलामुळे फिलिपाईन्स संघ आणखी दडपणाखाली आणला. या लागोपाठच्या दोन गोलनंतर ऑस्ट्रेलियाने सामन्यावर चांगल्यापैकी नियंत्रण मिळवले. फिलिपाईन्सवर दबाव आणत त्यांच्या कमजोर झालेल्या बचावफळीचा फायदा घेत ऑस्ट्रेलियाने ६७व्या मिनिटाला तिसरा गोल केला. एगमंडने स्पर्धेतील दुसरा सामना खेळताना स्पधेर्तील चौथा वैयक्तिक गोल करत ऑस्ट्रेलियाचे बाद फेरीतील स्थान, तसेच ब गटातील अव्वल स्थानही जवळपास निश्चित केले. सामना संपण्यास काही मिनिटे शिल्लक असताना फॉलरने संघाचा चौथा गोल करत संघाच्या विजयावर शिक्का मारला.


यासह आकडेवारीनुसार ऑस्ट्रेलियाने ब गटातील अव्वल स्थान जवळपास निश्चित केले असून गुरुवारी ते थायलंडविरुद्ध खेळतील. ऑसी संघाचा धडाका पाहून थायलंडविरुद्ध त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. तसेच, फिलिपाईन्सने पुढच्या सामन्यात इंडोनेशियाला नमवल्यास तेही ऑस्ट्रेलियासोबत बाद फेरीत आगेकूच करतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News