लोणी-धामणी : वार्ताहर (कैलास गायकवाड) दिः२४/११/२०२१.
बेल्हे (ता.जुन्नर) ते जेजूरी (ता.पूंरदर) या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून हा आंबेगाव, शिरूर,खेड,जुन्नर तालुक्यांना जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर लहान मोठया वाहनांची मोठया प्रमाणात वर्दळ वाढली आहे. रस्ता चांगला असल्यामूळे सर्वच लहान मोठया वाहनाचा वेग जास्त प्रमाणात वाढल्याने अपघाताचे प्रमाणही वाढण्यास सुरुवात झाली आहे. बुधवार (दिः24) रोजी सकाळी अकरा वाजता ब्रिझा कार एमएच-१४- जीएच-४३६३ पाबळ लोणी मार्गे पारगावच्या दिशेने चालली होती. व व्हॅगनार कार एमएच-१४- जीई-९३०९ लोणी वरून पाबळला चालली होती. मात्र चिंथ्यादेवा जवळ दोन्ही कार चालकांचा कारवरचा ताबा सुटला व समोरा समोर धडक झाली.व दोन्ही कार रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाल्या. दोन्ही कारमध्ये फक्त कार चालकच होते. ब्रिजा कारच्या चालकाला डोक्याला किरकोळ मार लागला आहे. त्याच रस्त्याने प्रवास करणार्या पाबळचे माजी सरपंच सोपान जाधव व स्थानिक ग्रामस्थांनी दोघांनाही दोन्ही कारच्या बाहेर काढून लोणी येथील दवाखान्यात दाखल केले. दोन्ही कारचा अपघात भिषण असला तरी सुदैवाने दोन्ही कारचालक सुखरूप बचावले.असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. हा रस्ता सुपर कारपेट डांबरीकरण असल्यामुळे सर्वच गाडयांचा वेग अधिक असल्याने वेगाचा अंदाज येत नाही.त्यामूळे अपघात होतात असे खडकवाडीचे माजी सरपंच अनिल डोके यांनी सांगितले.या रस्त्याचे काम चालू असतानाच सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील लहान मोठया वळणावर व इतर ठिकाणी छोटे-छोटे गतिरोधक टाकायला पाहिजे होते. तसे न केल्याने अपघातांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत बेल्हा जेजूरी रस्त्यावर पाबळ ते रोडेवाडी फाटा दरम्यान पंधरा ते वीस वेळा मोठे अपघात झाले आहेत.काहींना आपला प्राणही गमवावा लागला तेव्हा येथे गतिरोधक फारच महत्वाचा आहे. असे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संतोष पडवळ म्हणाले.