जांबुड, ता. माळशिरस, दि. ४ : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या ड्रोन सर्वेक्षणाला विरोध करण्याच्या भूमिकेमुळे प्रशासनाने आज पहाटे साडेपाच वाजता जांबुड माळवाडी येथील शेतकरी नेते नितीन घाडगे यांना त्यांच्या राहत्या घरी स्थानबद्ध केले. जांबुड व माळशिरस तालुक्यातील इतर गावांमध्ये ४ व ५ तारखेला होणाऱ्या ड्रोन सर्वेक्षणास शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होत आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना नितीन घाडगे म्हणाले की, "पोलिसांच्या माध्यमातून सरकारने कितीही दडपशाही केली तरी शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोध कायम राहणार आहे. प्रशासनाने मला स्थानबद्ध करून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला असला तरी हा संघर्ष थांबणार नाही."
ते पुढे म्हणाले, "शक्तीपीठ महामार्गामुळे हजारो एकर सुपीक शेती, शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधन आणि ग्रामीण भागाचे अस्तित्व धोक्यात येणार असेल, तर त्याला आमचा ठाम विरोध कायम राहील. शेतकऱ्यांच्या जमिनी आणि भवितव्य वाचवण्यासाठी लोकशाही मार्गाने लढा सुरूच राहणार आहे."
शेतकऱ्यांच्या भावना आणि हक्कांचा आदर करून प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा, अशी मागणी घाडगे यांनी केली. दरम्यान, परिसरातील शेतकऱ्यांनीही एकजूट कायम ठेवत ड्रोन सर्वेक्षणाला विरोध करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
"जमीन आमची, निर्णय आमचा!"
"शेतकरी एकजूट कायम, शक्तीपीठ महामार्गाला ठाम विरोध
