Type Here to Get Search Results !

१४५ आदिवासी आधारविना; पोशेरा ग्रामपंचायतीवर ‘श्रमजीवी’चे आंदोलन

१४५ आदिवासी आधारविना; पोशेरा ग्रामपंचायतीवर ‘श्रमजीवी’चे आंदोलन , प्रशासनाचे लेखी आश्वासन


"देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली, तरी आम्हा गरिबांना अजून एक आधार कार्डही मिळू नये?" असा संतप्त सवाल करत पोशेरा ग्रामपंचायतीवर श्रमजीवी संघटनेचा विराट मोर्चा धडकला. अंगाची लाहीलाही करणाऱ्या भीषण उन्हात, हातात संघटनेचे झेंडे घेऊन शेकडो आदिवासी कातकरी बांधव रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनात आपल्या पोटच्या लहान लेकरांना कडेवर घेऊन तासन्तास उन्हात उभे राहिलेल्या माता-भगिनींचे दृश्य प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारे होते. तब्बल ३ तास जबाबदार अधिकारी जागेवर नसल्याने आंदोलनकर्त्यांचा संताप अनावर झाला होता, मात्र अखेर प्रशासनाला नमते घ्यावेच लागले.


या मोर्चादरम्यान आंदोलनकर्त्यांनी प्रशासनासमोर आधार कार्डसह, गावातील तीव्र पाणीटंचाई, 'जल जीवन मिशन' नळ योजनेची सद्यस्थिती, रोजगार हमीचे काम आणि गेल्या काही वर्षांतील विकासकामांचा हिशोब छायाचित्रांसह देण्याची मागणी लावून धरली. देशाच्या स्वातंत्र्याला अनेक वर्षे उलटूनही पोशेरा ग्रामपंचायत हद्दीतील शून्य ते सतरा वर्षाच्या आतील आणि अठरा वर्षापेक्षा जास्त वय असणारे असे तब्बल दोनशे गरीब आदिवासी बांधव अजूनही आधार कार्डपासून वंचित असल्याचा गंभीर मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला. 


प्रशासनाच्या ढिम्म कारभाराविरोधात आदिवासी बांधवांनी घेतलेला आक्रमक पवित्रा आणि आंदोलनाचा वाढता दबाव पाहून अखेर ग्रामसेवक मंगेश पाटील आणि स्थानिक सरपंचांनी नमती भूमिका घेतली. त्यांनी श्रमजीवी संघटनेच्या शिष्टमंडळाशी तातडीने सकारात्मक चर्चा करून, वंचित १४५ नागरिकांना लवकरात लवकर तातडीने आधार कार्ड मिळवून देण्याचे आणि गावातील भीषण पाणीटंचाईचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे लेखी आश्वासन दिले. प्रशासनाकडून लेखी पत्र मिळाल्यानंतरच हे आंदोलन शांत झाले. मात्र, दिलेल्या मुदतीत काम न झाल्यास याहून तीव्र संघर्ष छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
या मोर्चामध्ये श्रमजीवी संघटनेचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष अंकुश वड, मोखाडा तालुका निरीक्षक रघुनाथ चौधरी, तालुका अध्यक्ष ईश्वर बांबरे, ता. सहसचिव रामदास वाघ, माजी तालुकाध्यक्ष पांडू मालक आणि संदीप पागारी प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच अनिल वाघ, विनोद वळवी, गोकुळा वळवी या सक्रिय कार्यकर्त्यांसह संघटनेचे शेकडो सभासद व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी पालघर :सौरभ कामडी 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad