Type Here to Get Search Results !

सहकार महर्षी याच्या पुतळ्याला विरोध का नको

 सहकार
 महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या
पुतळ्याला विरोध का नको या बद्दल थोडक्यात माहीती   
  

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन राज्य सरकारने १४ जानेवारी २०१७ ते १४ जानेवारी २०१८ या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रभर त्‍यांचा जन्मशताब्दी महोत्सव साजरा करण्याचे ठरवले. याच निमित्‍ताने माळशिरस येथील पंचायत समितीच्या सभागृहात शंकरराव मोहिते-पाटील यांचा अर्धाकृती पुतळा बसवण्याचा ठराव पंचायत समितीच्या वतीने करण्यात आला. मात्र, या ठरावाला काहींनी विरोध दर्शवला आहे. हा विरोध राजकीय आकसातून आहे, की नाही यावर बरीच चर्चा सुरू आहे. यामुद्यावरून गावांमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. पण, एखाद्या कर्तृत्ववान व्यक्तीच्या पुतळा उभारणीला एवढा विरोध का? आपल्यातीलच एका आसामीचा पुतळा उभा करून त्याच्याकडून प्रेरणा घ्यावी, असे विरोध करणाऱ्यांना वाटत नाही का?
पुतळ्याला असलेल्या विरोधाच्या निमित्ताने नव्हे, तर सोलापुरात सहकाराची पायाभरणी करणाऱ्या शंकरराव मोहिते-पाटील यांच्या कार्याचा आढावा घेणे गरजेचे आहे. नव्या पिढीला त्यांच्या कार्याची महती सांगणेही गरजेचे आहे. कारण, पाण्यासाठी तहानलेल्या सोलापूर जिल्ह्यात सहकाराचं बिज रोवून केवळ राज्यातच नव्हे, तर देशात आणि जगात सोलापूरला वेगळी ओळख निर्माण करून देण्यात शंकरराव मोहिते-पाटील यांचा मोलाचा वाटा आहे. किंबहुना सोलापूर जिल्ह्याच्या विकासाचा पाया रचण्याचे अतुलनीय काम शंकरराव यांनी केले आहे.


 पुतळ्याला, विरोध का आणि कशासाठी?
शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने माळशिरस येथील पंचायत समितीच्या सभागृहात पुतळा उभारण्यात येणार होता. त्याला काहींचा विरोध आहे. हा विरोध का आणि कशासाठी? असा प्रश्न सामान्य जनता आणि सोलापूरच्या बाहेर प्रत्येकाच्या मनात आहे. पण, एखाद्या जिल्ह्याच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तीचा पुतळा उभारण्यात गैर काय? त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांच्याप्रमाणेच समाजकार्यात स्वतःला झोकून देणारे आणखी शंकरराव जिल्ह्यात तयार होतील.


 शंकरराव मोहिते-पाटील यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जिल्‍ह्यात समाजक्रांती, हरितक्रांती, धवलक्रांती करत सहकार क्षेत्रात मोलाचे कार्य केले. कारखाना, शैक्षणिक संस्था, बँका, पतसंस्था त्यांनी उभ्या करून जिल्‍ह्‍यातील सर्वसामान्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणली. त्‍यामुळे माळशिरस येथील पंचायत समितीच्या सभागृहात शंकरराव मोहिते-पाटील यांचा पुतळा उभा करावा. त्‍यांच्या पुतळ्याकडे पाहिल्‍यानंतर शेतकऱ्यांच्या मनोभावना उंचावतील. संपूर्ण जीवन शेतकऱ्यांच्या विकासासाठी अर्पण करणाऱ्या, जिल्‍ह्यात सहकार रुजविणाऱ्या शंकरराव मोहिते-पाटील यांचा पुतळा पंचायत समितीत उभारला तर, याठिकाणी येणाऱ्या शेतकऱ्यांना त्‍यांचा पुतळा पाहून प्रेरणा मिळेल त्‍यामुळे हा पुतळा उभा राहिला पाहिजे. विरोधकांनी राजकीय द्वेषापोटी विरोध न करता, त्‍यांचे कार्य पहावे. कर्तृत्‍ववान व्यक्‍तिंचा पुतळा उभारला नाही तर त्‍यांचे कर्तृत्‍व कमी होत नाही. मात्र, अशा व्यक्‍तिंचा पुतळा उभा केला तर तो पुढच्या पुढच्या पिढीला प्रेरणादायी ठरेल.'


पंचायती समितीचे पक्षनेते प्रताप पाटील म्हणाले, 'शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जन्मशताब्‍दी निमित्‍त सध्या संपूर्ण राज्‍यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचनिमित्‍ताने माळशिरस पंचायत समितीत १९ सदस्‍यांसमोर शंकरराव मोहिते-पाटील यांचा अर्धाकृती पुतळा उभा रहावा, असा ८ मे २०१७ रोजी ठराव मांडला. या ठरावाला १९ पैकी १२ सदस्‍यांनी पाठिंबा दिला. तर, विरोधी सात सदस्यांनी, शासन स्‍थरावरील मार्गदर्शक सुचना आणि आदेश, शासन निर्णय असेल तर, पुतळा उभारण्यास हरकत नाही, असे सुचीत केले आहे.'
समाजमनावर छाप पाडणाऱ्या अनेक व्यक्तींचे पुतळे जगभरात ठिकठिकाणी आहेत. महात्मा गांधी यांचे पुतळे तर जगाच्या कानाकोपऱ्यांत आहेत. येणाऱ्या पिढीला हे पुतळे मार्गदर्शक ठरावेत, हा त्यामगाचा उद्देश असतो. सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी झटलेले दृष्टे शंकरराव मोहिते-पाटील यापुढे अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरावेत, असे आहेत. त्यामुळे त्यांच्या पुतळ्याला असलेला विरोध किती राजकीय असला, तरी तो बाळबोध वाटतो. हा विरोध शंकरराव यांच्या कर्तृत्वाविषयीच्या अज्ञानातून होत असेल, तर ते अज्ञान दूर व्हावे, हीच इच्छा.
कोण होते शंकरराव मोहिते-पाटील


समाजकार्याचा ध्यास घेतलेले शंकरराव १९४५ मध्ये वयाच्या २७ व्या वर्षी पहिल्यांदा अकलूज ग्रामपंचायतीचे सरपंच झाले. १ मे १९४७ रोजी साने गुरुजी यांनी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या मंदिरामध्ये दलित बांधवांना प्रवेश मिळावा, यासाठी उपोषण केले होते. त्‍या वेळी शंकरराव मोहिते-पाटील यांनी दोनशे ते तीनशे सहकाऱ्यांसह सानेगुरुजींची भेट घेतली आणि त्‍यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. अकलूजमधील मारूतीचे मंदिर आणि सार्वजनिक पाण्याचे हौद दलित बांधवांसाठी खुले करण्याचा निर्णय शंकरराव यांच्या पुढाकारानेच झाला. त्‍यानंतर सोलापूरचे तुळशीदास जाधव यांनी शंकरराव मोहिते-पाटील यांचा सत्‍कार केला. या सत्‍कार समारंभात शंकरराव मोहिते-पाटील यांनी शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय अकलूजच्या स्‍थापनेचा संकल्‍प केला आणि स्‍वत:च्या मालकीची अकरा एकर जमीन या संस्थेला देण्याची घोषणा केली. याच दिवसापासून जिल्‍ह्यात शंकरराव मोहिते-पाटील यांच्या कार्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.


कृषी उत्‍पन्न बाजार समितीची स्‍थापना
जिल्‍ह्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्‍या शेतीमालाला बाजापेठ उपलब्‍ध व्हावी आणि त्‍याला योग्‍य भाव मिळावा या हेतूने शंकरराव मोहिते-पाटील यांनी १९५० ला कृषी उत्‍पन्न बाजार समितीची स्‍थापना केली. जिल्ह्यात सहकाराची मुहूर्तमेढ याच संस्थेच्या माध्यमातून रोवली गेली, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही.


साखर कारखान्याची स्‍थापना
समाजकार्य आणि ग्रामपंचायतीच्या राजकारणात सक्रीय असलेले शंकरराव १९५२ मध्ये माळशिरस तालुक्‍यातून आमदार म्‍हणून निवडून आले. त्‍यानंतर त्‍यांनी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा असावा, या विचारातून १९६०मध्ये सहकार तत्‍वावर  यशवंत सहकारी साखर कारखान्याची (आताचा सहकार महर्षी सहकारी साखर कारखाना) स्‍थापना केली. आज जिल्‍ह्‍यात तब्‍बल ३९ कारखाने आहेत. आशिया खंडात सर्वात जास्‍त कारखाना असलेला जिल्‍हा म्‍हणून सोलापूर जिल्‍ह्‍याची ओळख आहे. ३९ कारखान्यांपैकी अनेक कारखाने सहकार तत्‍वावर चालतात. यात शंकरराव मोहिते-पाटील यांचे मोलाचे योगदान आहे.


मराठी शाळा सुरू केल्या
ग्रामीण भागातील मुलांना घरापासून जवळ शिक्षण मिळावे म्‍हणून १९४९ला सदाशिवनगर येथे मराठी माध्यमाची पहिली शाळा शंकरराव मोहिते-पाटील यांनी सुरू केली. त्‍यांनतर तालुक्‍यातील कोळेगाव, मांडकी, इस्‍लामपूर, बोरगांव, फोंडशिरस, चाकुरे, पोरगाव, तोंडले आणि माढा तालुक्‍यातील पिंपळनेर या गावांत शाळा सुरु केल्‍या.


मोहिते-पाटील महाविद्यालयाची स्‍थापना
शाळांमध्ये शिकून पुढे येत असलेल्या जिल्‍ह्यातील मुलांना उच्च शिक्षण मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून १९६७ला शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयाची स्‍थापना केली. या कॉलेजच्या स्‍थापनेमुळे ग्रामपंचायत स्‍तरावर कॉलेज सुरु करणारे अकलूज हे महाराष्‍ट्रातील पहिले गाव ठरले.


ग्रीन फिंगर शाळा
ग्रामीण भागातील मुलांना इंग्रजी शिकता यावे या उद्देशाने त्‍यांनी अकलूज येथे १९७५ला ग्रीन फिंगर या निवासी शाळेची स्‍थापना केली.


शिवामृत दूध संघ
शेतीबरोबर शेतकऱ्यांना जोड धंदा असावा यासाठी १९७६ ला शंकरराव मोहिते-पाटील यांनी शिवामृत दूध संघ स्‍थापन केला. त्‍यांनी बेंगळुरूवरून काही गायी आणल्‍या आणि स्‍वत:च्या गोठ्यावर ठेवल्‍या. या गायींना येथील हवामान मानवते का? हे पाहून तालुक्‍यातील प्रत्‍येक शेतकऱ्याला एक जर्सी गाय दिली. या गायींना शिवामृत संघाच्या माध्यमातून औषाधोपचार दिला जाई. आज तालुक्‍यात साडेतीन ते चार लाख लिटर दुधाचे उत्‍पादन होते. या व्यवसायाची पायाभरणी शंकराव मोहिते-पाटील यांनी केली.   

                         गौरी-शंकर उद्योगाची स्‍थापना
महिला सक्षमीकरणासाठीही शंकरराव मोहिते-पाटील यांनी प्रयत्‍न केले. महिलांच्या हाती काहीतरी काम मिळावे त्‍यांना स्‍वत:च्या हाती पैसा मिळावा यासाठी गौरी-शंकर उद्योगाची स्‍थापना केली. या उद्योगात माहिलांना चटणी, लोणचे, पापड असे घरगुती पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत असे. महिलांनी बनवलेल्‍या पदार्थाला बाजारपेठही उपलब्‍ध करून दिली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad