Type Here to Get Search Results !

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात प्रथमच घडला असा इतिहास

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात प्रथमच घडला असा इतिहास


खेडी व्यव्हारदळे (अमळनेर): समाजात आजही अनेक जुन्या रूढी-परंपरांचे पालन केले जाते. विशेषतः अंत्यसंस्काराच्या वेळी मुलानेच वडिलांना अग्नी द्यावा, अशी समजूत आहे. मात्र, अमळनेर तालुक्यातील खेडी व्यव्हारदळे या गावाने एका ऐतिहासिक आणि पुरोगामी घटनेचा अनुभव घेतला. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या सहा मुलींपैकी एक असलेल्या मंगलाबाई भीमराव मेराळै यांनी आपल्या वडिलांना मुखाग्नी देऊन एक नवा इतिहास रचला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, खेडी व्यव्हारदळे येथील रहिवासी अमृत नागो गजरे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना एकूण सहा मुली होत्या, मुलगा नव्हता. अमृत गजरे यांचे संपूर्ण आयुष्य कष्टाचे राहिले, मात्र त्यांच्या वृद्धापकाळात त्यांची कन्या मंगलाबाई भीमराव मेराळै यांनी वडिलांचा सर्व सांभाळ केला. केवळ पालनपोषणच नाही, तर वडिलांच्या सर्व गरजा आणि त्यांची सेवा मंगलाबाईंनी पोटच्या मुलाप्रमाणे केली.


वडिलांच्या निधनानंतर अंत्यसंस्काराचा प्रश्न आला असता, मंगलाबाईंनी स्वतः पुढे येत वडिलांना अग्नी देण्याचा निर्णय घेतला. 'मुलगा आणि मुलगी एकसमान' असल्याचे केवळ बोलून न दाखवता त्यांनी ते कृतीतून सिद्ध केले. एरवी पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाणाऱ्या या विधीमध्ये एका महिलेने, एका मुलीने वडिलांचे अंतिम कर्तव्य पार पाडल्याने संपूर्ण गावात आणि अमळनेर तालुक्यात या धाडसी निर्णयाचे कौतुक होत आहे.

अमळनेर तालुक्याच्या इतिहासात अशाप्रकारे मुलीने वडिलांना अग्नी देण्याची ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे. या घटनेने समाजातील जुन्या विचारांना छेद दिला असून, मुली देखील मुलांप्रमाणेच सर्व कर्तव्ये पार पाडू शकतात, असा संदेश या निमित्ताने देण्यात आला आहे.

अमृत नागो गजरे यांच्या अंत्ययात्रेला गावातील ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंगलाबाईंनी वडिलांना दिलेला हा 'अग्निडाग' केवळ एक विधी नसून, ती पित्याप्रती असलेली कृतज्ञता आणि प्रेमाची साक्ष असल्याचे उपस्थितांनी व्यक्त केले.

या ऐतिहासिक पाऊलामुळे खेडी व्यव्हारदळे गावाचे नाव आता एका पुरोगामी विचारासाठी ओळखले जाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad