Type Here to Get Search Results !

Breaking news | राज ठाकरेंचं देवेंद्र फडणवीस यांना पत्र

श्री. देवेंद्र फडणवीस
उप-मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

यांसी सस्नेह जय महाराष्ट्र!

प्रिय देवेंद्रजी,

सर्वप्रथम महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री म्हणून आपण जबाबदारी स्विकारल्यायाबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. वाटलं होतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच परताल, परंतू ते व्हायचं नव्हतं. असो...

तुम्ही ह्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सलग पाच वर्षे काम केलेत. आत्ताचं सरकार आणण्यासाठीही अपार कष्ट तुम्ही उपसलेत आणि इतकं असुनही आपल्या मनातील हुंदका बाजूला सारून, पक्षादेश शिरसावद्यं मानून उप-मुख्यमंत्री पदाची सूत्रे हातात घेतलीत. पक्ष, पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षेपेक्षा मोठा आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं. पक्षाशी बांधीलकी म्हणजे काय असतं त्याचा हा वस्तुपाठच आहे. ही गोष्ट देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासारखी आहे. खरोखरच अभिनंदन!

आता जरा आपल्यासाठी -

ही बढती आहे की अवनती ह्यात मी जात नाही आणि कुणी जाऊही नये, पण एक सांगतो की धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. ह्या मागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही! तुम्हाला ह्यापुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे.

एक निश्चित की तुम्ही तुमचं कर्तृत्व महाराष्ट्रापुढे सिद्ध केलेलंच आहे त्यामुळे देशाच्या भल्यासाठीही तुम्हाला काम करण्याची अधिक संधी मिळो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना.

पुन्हा एकदा तुमचं मनःपूर्वक अभिनंदन!

आपला मित्र,
राज ठाकरे

(मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छापत्र!)






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News