पालघर : सौरभ कामडी
मोखाडा तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने साई मंदिर, मोखाडा येथे महावैष्णव मेळाव्याचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले. तालुक्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या या मेळाव्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
या मेळाव्यास हजारो वारकरी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकत्र येऊन भक्तीची एकजूट आणि शक्ती दाखवून दिली असे पहिल्या दिवशी माजी उपसभापती प्रदीप वाघ आपल्या मनोगतातून व्यक्त झाले. टाळ-मृदुंगाच्या गजरात, अभंग-कीर्तनांच्या सुरावटीत आणि विठ्ठल नामाच्या घोषात साई मंदिर परिसर दुमदुमून गेला असेही वाघ म्हणाले.पुढे म्हणाले कार्यक्रमात कीर्तन, प्रवचन, भजन, सामूहिक हरिनाम सप्ताह आदी धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांनी वारकरी संप्रदायाच्या परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत समाजात नैतिक मूल्ये आणि सदाचार टिकवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे ही वाघ यांनी सांगितले.
मेळाव्याच्या पहिल्या दिवशी खोडाळा विभागास मानाचा बहुमान देण्यात आला. विविध दिंड्यांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. वारकरी बांधवांनी शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदवत भक्ती, समता आणि बंधुभावाचा संदेश दिला.
या महावैष्णव मेळाव्यासाठी तालुक्यातील सर्व वारकरी संप्रदाय गेल्या एक वर्षापासून नियोजन करत होते. नियोजनबद्ध तयारी, स्वयंसेवकांचे परिश्रम आणि सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडतो आहे.मोखाडा तालुक्यात प्रथमच आयोजित या महावैष्णव मेळाव्यामुळे वारकरी संप्रदायातील एकात्मता अधिक दृढ झाली असून, भविष्यातही अशा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.
